प्लॅस्टिक व चिनी मांजाविरोधात ठाणे पालिकेची कारवाई; 6 दिवसांत 53,500 रुपयांचा दंड
ठाणे, 9 जानेवारी, (हिं.स.) : पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा चिनी मांजा, चिनी दोरा तसेच नायलॉन व प्लास्टिकपासून (सिंथेटिक) तयार करण्यात आलेला कृत्रीम मांजा हा मानवी जीवन, पक्षी व पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत असल्याने, राष्ट्रीय हरित न्यायाधिकर
प्लॅस्टिक व चिनी मांजाविरोधात ठाणे पालिकेची कारवाई; 6 दिवसांत 53,500 रुपयांचा दंड


ठाणे, 9 जानेवारी, (हिं.स.) : पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा चिनी मांजा, चिनी दोरा तसेच नायलॉन व प्लास्टिकपासून (सिंथेटिक) तयार करण्यात आलेला कृत्रीम मांजा हा मानवी जीवन, पक्षी व पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत असल्याने, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अशा मांजाच्या विक्री, उत्पादन, साठवण व वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचनेनुसार प्लास्टिक व चिनी व सिंथेटिक मांजाविरोधात कडक कारवाई सुरू केली असून या कारवाईअंतर्गत 6 दिवसांत प्रभागसमितीनिहाय एकूण 856 आस्थापनांना भेटी देण्यात आल्या असून 39.2 किलो प्लास्टिक व 5.5 किलो चिनी मांजा जप्त करण्यात असून या कारवाईअंतर्गत एकूण 53,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले.

चिनी मांजा जैविकरित्या विघटन न होणारा असल्याने जलनिस्सारण व्यवस्था, नद्या, ओढे, जलाशय यांना हानी पोहोचते. तसेच जनावरांनी असा मांजा गिळल्यास गुदमरून मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. विद्युत वाहक असल्यामुळे वीज वाहिन्या, उपकेंद्रे यांवर ताण येऊन वीजखंडित होणे, अपघात व जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते यासाठी ठाणे महापालिकेने सहाय्यक आयुक्त स्तरावर दक्षता पथकांची स्थापना करून प्रभाग समितीनिहाय आस्थापनांची तपासणी सुरू केली असून ही कारवाई अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांच्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रण विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

आस्थापनधारक व नागरिकांनी प्रतिबंधित चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन अथवा प्लास्टिक कृत्रीम मांजा खरेदी व वापर करू नये. याबाबत पोलीस यंत्रणेलाही सूचित करण्यात आले आहे. प्रतिबंधित मांजाची विक्री, साठवण किंवा वापर आढळल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक: 8657887101 ई-मेल: pcctmc.ho@gmail.com तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक 5 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत प्रभागसमितीनिहाय करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील -

प्रभागसमिती एकूण आस्थापना जप्त प्लास्टिक जप्त मांजा दंड आकारणी

कळवा 133 - - -

दिवा मुंब्रा 141 - - -

नौपाडा कोपरी उथळसर 142 8.2 - 7000

वर्तकनगर 145 - 3.5 10000

माजिवडा मानपाडा 140 24 0.1 12500

लोकमान्य सावरकर 155 07 01 24000

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande