
नागपूर, 09 जानेवारी (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरात वाळू व्यवसायाशी संबंधित प्रकरणात शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई केली. नागपूर आणि दिल्ली येथील ईडीच्या सुमारे 10 पथकांनी पहाटे 5 वाजल्यापासून एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शासनाची वाळू रॉयल्टी चुकवून 2021 मध्ये कोट्यवधी रुपयांचा वाळू व्यवसाय केल्याप्रकरणी काही वाळू व्यवसायिकांवर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्याच प्रकरणाच्या अनुषंगाने ईडीकडून ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे. संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी चौकशीसाठी वारंवार बोलावण्यात आले होते, मात्र चौकशीत अपेक्षित सहकार्य न केल्यामुळे ईडीने थेट छापेमारीचा मार्ग स्वीकारल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
या कारवाईदरम्यान शिवसेना उबाठा-गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात रेती विक्रीदरम्यान 4 वर्षांपूर्वी झालेल्या कथित गैरव्यवहाराशी ही कारवाई संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच ईडीची ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, ईडीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून, छापेमारी आणि कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी