
छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)। महाराष्ट्रात सह संपूर्ण देशात गाजलेल्या टी-सीरिज म्युझिक कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती गुलशनकुमार यांच्या हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुख्य मारेकरी (शूटर) अब्दुल रऊफ उर्फ मर्चेंट याचा उपचारांवेळी मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात प्रकृती बिघडल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले होते. गेल्या काही वर्षापासून तो संभाजी नगर येथील हर्सुल कारागृहात तो होता
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट १९९७ रोजी सकाळी गुलशनकुमार मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या जितेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराबाहेर कारमधून उतरताच दबा धरून बसलेल्या
मारेकऱ्यांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. काही क्षणांतच गुलशनकुमार कोसळले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाले. हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. अब्दुल रऊफ उर्फ मर्चेंट हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याचा जवळचा साथीदार आणि प्रशिक्षित शार्प शूटर होता.
गुलशनकुमार यांच्याकडे अबू सालेमच्या टोळीने खंडणीची मागणी केली होती. मात्र, ती देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. याच कारणातून त्यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. या कटात अब्दुल मर्चेंटने मुख्य शूटरची भूमिका बजावली होती. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो छत्रपती संभाजी नगर येथील हर्मूल कारागृहात शिक्षा भोगत होता. दरम्यान, छातीत तीव्र वेदना झाल्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis