छ. संभाजीनगर महापालिका प्रशासनासमोर दोन महिन्यांत पाचशे कोटी रुपयांच्या करवसुलीचे आव्हान
छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनासमोर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत तब्बल पाचशे कोटी रुपयांच्या करवसुलीचे आव्हान आहे. आतापर्यंत कर वसुलीने दोनशे कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. दोनशे कोटींची वसुली प
छ. संभाजीनगर महापालिका प्रशासनासमोर दोन महिन्यांत पाचशे कोटी रुपयांच्या करवसुलीचे आव्हान


छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनासमोर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत तब्बल पाचशे कोटी रुपयांच्या करवसुलीचे आव्हान आहे. आतापर्यंत कर वसुलीने दोनशे कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. दोनशे कोटींची वसुली पालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक वसुली मानली जात आहे.

महापालिकेच्या प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर वसूलीचे उद्दीष्ट सातशे कोटी रुपयांचे ठेवले आहे. त्यात चालू वर्षाचा मालमत्ता कर आणि थकीत मालमत्ता कर याचा समावेश आहे. कर वसूलीचे प्रमाण वाढावे यासाठी पालिकेने विविध योजना राबवल्या. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शास्ती से आझादी ही योजना राबवून थकीत करावरील शास्तीमध्ये ९५ टक्के सूट दिली. त्यानंतर हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शास्ती से मुक्ती ही योजना राबवून थकीत कराच्या शास्तीवर ७५ टक्के सूट दिली. या दोन योजनांची मुदत संपल्यावर थकीत करावरील शास्तीत पन्नास टक्के सूट देण्याच्या योजनेची घोषणा पालिकेने केली. कर वसूलीच्या कामावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ देण्याच्या उद्देशाने विविध प्रयोग देखील करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून आतापर्यंत कर वसूलीने दोनशे कोटींचा पल्ला गाठल्याची माहिती आहे.

पालिकेने कर वसुलीचे उद्दीष्ट सातशे कोटी रुपयांच्या ठेवले आहे. त्याच्या तुलनेत दोनशे कोटी रुपयांनी वसुली झाल्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात उर्वरित पाचशे कोटींच्या कर वसूलीचे उद्दीष्ट पालिकेच्या यंत्रणेसमोर असेल अशी माहिती सूत्रांनी दिली. जानेवारी महिन्यात पालिकेची निवडणूक होत आहे. जवळपास ऐंशी टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामावर नियुक्त करण्यात आलेआहेत. १६ जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागणार असला तरी पुढचे पंधरा दिवस निवडणुकीच्या वातावरणाचेच असतील असे मानले जात आहे. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यातच जास्तीत जास्त कर वसुली होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande