

नवी दिल्ली, 09 जानेवारी (हिं.स.) - भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आज 'आधार' शुभंकराचे अनावरण केले. आधार सेवांचे आकलन लोकांना चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी हे एक नवीन 'रेसिडेंट फेसिंग' संवाद माध्यम असेल. 'उदय' (Udai) नावाचा हा आधार शुभंकर आधारशी संबंधित माहिती अधिक सुसंगत आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल.आधार सेवांचे अद्ययावतीकरण, प्रमाणीकरण, ऑफलाइन पडताळणी, माहितीची निवडक देवाणघेवाण, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि जबाबदार वापर यांसारख्या अनेक विषयांवरील संवाद हा शुभंकर सोपा करेल.
हा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी, यूआयडीएआयने माय जीओव्ही प्लॅटफॉर्मवर राष्ट्रीय स्तरावर डिझाइन आणि नाव निवडीसाठी स्पर्धा आयोजित करून एक खुला आणि सर्वसमावेशक मार्ग निवडला. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यूआयडीएआय कडे देशभरातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि डिझाइनर्स यांच्याकडून 875 प्रवेशिका प्राप्त झाल्या – ज्यामध्ये प्रत्येकाने 'आधार' त्यांच्यासाठी काय आहे, याचे एक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण केले होते. निवड प्रक्रियेत निष्पक्षता आणि अचूकता राखण्यासाठी बहु-स्तरीय मूल्यमापन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या प्रक्रियेतून जे समोर आले ती एक सुंदर निर्मिती आहे – जी जनमानसाच्या कल्पनेतून साकारली गेली आहे आणि संस्थात्मक परिश्रमातून अधिक परिष्कृत झाली आहे.
शुभंकर डिझाइन स्पर्धेत केरळमधील त्रिशूरचे अरुण गोकुळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर महाराष्ट्रातील पुणे येथील इद्रिस दवाईवाला आणि उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील कृष्ण शर्मा यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.
शुभंकर नामकरण स्पर्धेत भोपाळच्या रिया जैन यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर पुण्यातील इद्रिस दवाईवाला आणि हैदराबादमधील महाराज सरन चेल्लापिल्ला यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.
यूआयडीएआय चे अध्यक्ष नीलकंठ मिश्रा यांनी तिरुवनंतपुरम येथील एका कार्यक्रमात या शुभंकराचे अनावरण केले आणि विजेत्यांचा गौरव केला. आधारचा संवाद अधिक सोपा, सर्वसमावेशक आणि भारतातील शंभर कोटींहून अधिक रहिवाशांसाठी अधिक सुसंगत बनवण्याच्या यूआयडीएआयच्या निरंतर प्रयत्नांमधील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मत अध्यक्ष नीलकंठ मिश्रा यांनी व्यक्त केले.
यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार म्हणाले की, एका खुल्या राष्ट्रीय स्पर्धेद्वारे या शुभंकराचे डिझाइन आणि नाव निश्चित करण्यासाठी लोकांना आमंत्रित करून, यूआयडीएआयने आधारच्या मूळ तत्त्वाचा पुनरुच्चार केला आहे: 'सहभागातूनच विश्वास आणि स्वीकारार्हता निर्माण होते. लोक आधारशी एक 'सार्वजनिक हित' म्हणून किती सखोलपणे जोडले गेले आहेत, हेच या उपक्रमाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातून दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.
यूआयडीएआयचे उपमहासंचालक विवेक सी. वर्मा म्हणाले की, हा शुभंकर एक सोबती आणि निवेदक म्हणून आपला प्रवास सुरू करत असताना, रहिवाशांना आधारशी संबंधित माहिती सहजपणे मिळवण्यासाठी त्याची मोठी मदत होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी