
परभणी, 09 जानेवारी (हिं.स.)।
परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या माध्यमातून परभणीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता द्यावी, आपण परभणी दत्ता घेवू अन् सर्वांगिण विकासाचा मार्ग खूला करु, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिले.
महानगरपालिका निवणूकीच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.09) उपमुख्यमंत्री पवार यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार श्रीमती फौजिया खान, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, प्रथम महापौर तथा महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, अक्षय देशमुख, माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे, संतोष बोबडे यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते. आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणीत सुध्दा एकत्रितपणे निवडणूक लढवित आहेत. या पक्षाने सर्व धर्म व जाती-पातीच्या उमेदवारांना उमेदवारीत प्राधान्य दिले आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवरच पक्षाद्वारे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे कृतीसुध्दा तशीच आहे. ज्येष्ठांबरोबर नवख्यांनासुध्दा उमेदवारीत प्राधान्य दिले आहे. या जून्या पिढीचा अनुभव व नव्या पिढीचे वर्तमान आणि भविष्याबाबतच्या संकल्पना या प्रत्यक्षात उतराव्यात असे प्रयत्न राष्ट्रवादीद्वारे केले जाणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांचा परभणीकरांनीसुध्दा अनुभव विचारावा, त्या पध्दतीने परभणीतसुध्दा काय काय करता येईल या पध्दतीने विचार करावा, असे आवाहन करतेवेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या निधीशिवाय विकास अशक्य आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारच्या माध्यमातून काय काय करता येईल ते आपण निश्चितच परभणीकरांकरीता करु, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. महापालिकेंतर्गत भूमीगत गटार योजना, सुधारित पाणी पुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना किंवा अन्य महत्वाकांक्षी योजनांना राज्य सरकारने मंजूरी बहाल केली आहे. कोट्यवधींची तरतूदसुध्दा केली आहे. टप्प्या टप्प्याने निधी वितरित केला जाईल, सर्व कामे चांगली अन् दर्जेदार व्हावी या दृष्टीनेही पूर्णतः लक्ष केंद्रीत केले जाईल, परभणीच्या बाजूचे दोन्ही वळण रस्ते मार्गी लागावेत या साठीही प्रयत्न होतील, महापालिकेचे उत्पन्न वाढावे या दृष्टीने व्यापारी संकुले किंवा अन्य मार्गाद्वारे स्व उत्पन्न वाढविले जाईल, वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीबरोबरच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचीसुध्दा उभारणी केली जाईल, त्याद्वारे सर्वसामान्य रुग्णांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा या जिल्हास्थानीच मिळाव्यात या दृष्टीने प्रयत्न केले जातील, कॅन्सर हॉस्पिटलचीसुध्दा उभारणी होईल. सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा, मराठी माध्यमांच्या शाळांचे पुनर्जीवर, एआय तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमाबरोबर अन्य योजनासुध्दा मार्गी लावल्या जातील, आपला तो शब्द आहे. तो शब्द आपण आजपर्यंत पाळला आहे, असे ते म्हणाले. राजकीय इच्छाशक्ती असेल तरच सर्वकाही शक्य आहे. त्यामुळेच परभणी महापालिकेस जीएसटीपोटी मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळावे, महापालिकेंतर्गत नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, महापालिकेच्या कारभारात आमूलाग्र सुधारणा व्हावी, तसेच कृषि विद्यापीठांतर्गत जमीनीवरच मोठे क्रिडा संकुल उभारावे, दर्गा परिसराच्या विकास आराखड्यास मुहूर्त लागावे यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करु, असे नमूद करतेवेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी परभणीकरांनी महापालिकेत राष्ट्रवादीच्या हाती सत्ता सुपूर्त करावी, आपण परभणी दत्तक घेऊ आणि विकासाचा मार्ग मोकळा करु, असा शब्द दिला.दरम्यान, या सभेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis