भूजल वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल; आनंदवाडी ओहळावर बांधला वनराई बंधारा
रायगड, 09 जानेवारी (हिं.स.)। जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उपक्रमांतर्गत नेरळ येथील आनंदवाडी परिसरातील ओहळ्यावर ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधारा उभारण्यात आला. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून
भूजल वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल; आनंदवाडी ओहळावर वनराई बंधारा बांधला


रायगड, 09 जानेवारी (हिं.स.)।

जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उपक्रमांतर्गत नेरळ येथील आनंदवाडी परिसरातील ओहळ्यावर ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधारा उभारण्यात आला. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून भूजलपातळी वाढवणे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारणे आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

ग्रामस्थांनी एकत्र येत बांबू, दगड, माती व स्थानिक साहित्याचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने बंधारा उभारला. या श्रमदानातून ग्रामस्थांमध्ये एकोप्याची भावना अधिक दृढ झाली. बंधाऱ्यामुळे पावसाळ्यातील पाणी अडवले जाऊन आजूबाजूच्या विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार असून, उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना मा. गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांनी “जलसंवर्धन ही काळाची गरज असून, अशा लोकसहभागातून राबविलेल्या उपक्रमांमुळे गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो,” असे मत व्यक्त केले. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्वला भोसले यांनी ग्रामस्थांच्या श्रमदानाचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचे आवाहन केले.

या उपक्रमावेळी गट विकास अधिकारी सुशांत पाटील साहेब, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्वला भोसले , तसेच चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय ग्रामपंचायत अधिकारी कारले व ग्रामपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून वनराई बंधाऱ्याचे महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगितले.

या उपक्रमामुळे आनंदवाडी परिसरात जलसंधारणाबाबत सकारात्मक संदेश पसरला असून, पर्यावरण रक्षणासाठी ग्रामस्थांचा पुढाकार उल्लेखनीय ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande