
ठाणे, 9 जानेवारी, (हिं.स.)। ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील शिवसेनेने उमेदवार मिनाक्षी शिंदे यांची मोर्फ केलेली ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. आवाज मॉर्फ तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून जातीमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. घाणेरडे राजकारण करून निवडणुका जिंकल्याचा प्रयत्न सुरू असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने बदनामी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप माजी महापौर तसेच शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मिनाक्षी शिंदे यांनी केला. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही, मला पण कोणीतरी ती क्लिप पाठवली आहे. माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काहीच संबंध नाही असे स्पष्टीकरण मीनाक्षी शिंदे यांनी दिले. तसेच याप्रकरणी चितळसर मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
ठाण्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. याचा धसका घेत या प्रभागातील विरोधकांनी मिनाक्षी शिंदे यांना टार्गेट केले आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक व्हिडिओ तसेच ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जाणूनबुजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जात तसेच धर्माचा आधार घेऊन राजकीय वातावरण प्रदूषित केले जात असल्याचा आरोप मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांना याआधीच तक्रार देखील करण्यात आली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाल्याने घाणेरडे राजकारण
घराणेशाहीला फाटा देऊन शाखाप्रमुख विक्रांत वायचळ या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असल्याने काहीच्या मनात चीड पसरली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे. विचारांची लढाई न करता चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मिनाक्षी शिंदे यांनी केला. अशा प्रवृत्तीला मानपाड्याची जनताच उत्तर देईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
फेक अकाउंट चालवणाऱ्यांचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करावी
महिलांच्या, मुलींच्या नावाने फेक अकाउंट तयार करून समाज समाजात विकृती निर्माण केली जात आहे. फेक अकाउंट द्वारे महिला उमेदवारांना टार्गेट केले जात आहे. अशा या फेक अकाउंट चालवणाऱ्यांचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मिनाक्षी शिंदे यांनी पोलिसांकडे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर