
ठाणे, 09 जानेवारी (हिं.स.)। - फोडाफोडी, पळवापळवी आणि बिनविरोध निवडणूक यावरून आधीच मतदारांच्या मनात संताप असताना प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवणाऱ्या शिंदे गटाच्या उमेदवार मीनाक्षी शिंदे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ऑडिओ क्लिप मध्ये त्यांनी आगरी समाजाविषयी अत्यंत खाच्या पातळीवर टीका केल्याने शिंदे गटाच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापौर पदाची जबाबदारी सांभाळलेल्या महिलेकडून अशी भाषा शोभते का? असा सवाल आगरी समाजचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला. शिंदे गटाने मराठी संस्कृती धुळीस मिळवली असून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मीनाक्षी शिंदेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसे ठाण्यात शिंदे गटाकडून राजकीय वातावरण खराब केले जात आहे. सत्त्तेच्या जीवावर आता थेट धमकी दिली जात आहे. त्यातच माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची एक ऑडिओ क्लिप आज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे यांनी थेट आगरी समाजाला उद्देशून अपमानास्पद शब्द वापरला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे आगरी समाजात तीव्र नाराजी पसरली असून त्यांच्या या वक्तव्याचा आगरी, कोळी समाजाकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समाजाच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, मनसेच्या ठाणे शहर अध्यक्ष समीक्षा मार्कडे आदी जण उपस्थित होते.
*एआय ऑडिओ क्लिप म्हणणे हे हास्यास्पद*
मॉर्फ तसेच एआय ची ऑडिओ क्लिप म्हणणे हे हास्यास्पद असून मीनाक्षी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. आगरी समाजाविषयी अपशब्द काढणाऱ्या शिंदे गटाच्या या महिला लोकप्रतिनिधीचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच ठाण्यातील दादागिरी, धमकी मोडीत काढण्यासाठी मतदार क्रांतीची मशाल पेटवतील असा विश्वास यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर