* हनोईतील ऐतिहासिक यशाबद्दल पाचही पदकविजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान; अनुभवकथनातून उलगडला आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा रोमांच
मुंबई, 06 ऑक्टोबर (हिं.स.) - व्हिएतनाममधील हनोई येथे २५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित १९ व्या 'आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड' (IOAA) मध्ये, भारतीय संघाने चार सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक अशी नेत्रदीपक कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय यशाबद्दल, ६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील मानखुर्द येथील 'होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन' (HBCSE), 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' (TIFR) येथे या संघाचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये प्रांजल दीक्षित (तेलंगणा), सुमंत गुप्ता (दिल्ली), अक्षत श्रीवास्तव (हरियाणा), अर्णव सेहरावत (हरियाणा) या विद्यार्थ्यांनी सुवर्ण, तसेच हर्षिल पटेल (गुजरात) याने रौप्य पदकाची कमाई करत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांसोबत एक अनौपचारिक संवाद आयोजित करण्यात आला होता. या संवादातून भारतीय विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक यशाची अधिक माहिती आणि त्यांना आलेले अनुभव सांगत उपस्थितांना भारावून टाकले.
भारतीय संघासोबत प्रा. भासवती मुखर्जी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई आणि प्रा. संवेद कोळेकर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरू हे दोन मार्गदर्शक होते. यांनीही आपले अनुभव या प्रसंगी सांगितले. भारतीय संघाच्या या शंभर टक्के पदकविजेत्या कामगिरीने देशाच्या युवा वैज्ञानिक प्रतिभेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली. एकूणच या यशोगाथेतून हनोईत भारतीय विद्यार्थ्यांनी केवळ पदके जिंकली नाहीत, तर भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचा आणि युवा प्रतिभेचा जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे. चार सुवर्ण आणि एका रौप्याची ही कामगिरी भारतीय विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला मिळालेली दाद आहे.
HBCSE-TIFRचे संचालक प्रा. अर्णब भट्टाचार्य यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. परीक्षा आणि स्पर्धेचा ताण आता संपला असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या या मोठ्या यशाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
भारतीय संघाने व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाचे विशेष आभार मानले. भारतात परतण्यापूर्वी दूतावासाने भारतीय पदक विजेत्यांसाठी विशेष सत्कार समारंभ आयोजित केला होता. भारतीय राजदूत आणि दूतावासाने केलेल्या या विशेष सन्मानाबद्दल विद्यार्थ्यांसह संघातील सर्व सदस्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.
HBCSE-TIFRचे प्रा. अनिकेत सुळे हे सध्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचे संचालन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे जागतिक खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र शिक्षण क्षेत्रात HBCSEचा सातत्यपूर्ण सहभाग अधोरेखित होतो.
विशेष म्हणजे, 2025 मध्ये भारताने मुंबईत IOAAचे आयोजन केले होते. त्या वेळी भारताने केलेल्या उत्कृष्ट आयोजनाचे तसेच स्पर्धेतील उच्च शैक्षणिक दर्जाचे सहभागी देशांनी कौतुक केले होते. भारताने गेल्या वर्षी निर्माण केलेले हे उच्च मानदंड यापुढेही कायम ठेवण्याची आंतरराष्ट्रीय समुदायाची अपेक्षा असल्याचे प्रा. सुळे यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी