रेल्वेच्या १८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द होणार
आगामी १ जानेवारी पासून सामान्य एक्स्प्रेस म्हणून धावणार अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क बंद होण्याची शक्यता, जळगाव-भुसावळमार्गे जाणाऱ्या गाड्यांचाही समावेश जळगाव, ३० ऑक्टोबर (हिं.स.) : रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी दिलासादायक बातम
डहाणू–नाशिक रेल्वे प्रकल्पाचे पूर्व प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण


आगामी १ जानेवारी पासून सामान्य एक्स्प्रेस म्हणून धावणार

अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क बंद होण्याची शक्यता,

जळगाव-भुसावळमार्गे जाणाऱ्या गाड्यांचाही समावेश

जळगाव, ३० ऑक्टोबर (हिं.स.) : रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या १८ मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द करण्याची तयारी केली आहे. या गाड्या १ जानेवारी २०२७ पासून सामान्य एक्स्प्रेस म्हणून चालविण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांकडून आकारले जाणारे अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क बंद होऊन तिकीटदरात काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्यांचाही या संभाव्य बदलात समावेश असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.

सध्या सुपरफास्ट श्रेणीतील रेल्वेगाड्यांच्या तिकिटावर प्रवाशांकडून अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क आकारले जाते. मात्र, संबंधित गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द झाल्यास हे शुल्क आकारले जाणार नाही. परिणामी, नियमित रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावरील आर्थिक भार कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संभाव्य बदलांचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांवरही होणार आहे. सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस, एलटीटी-अयोध्या कॅन्ट तुळशी एक्स्प्रेस, एलटीटी-बनारस एक्स्प्रेस आणि पुणे-काझीपेट एक्स्प्रेस यांसारख्या गाड्यांचा या बदलांशी संबंधित यादीत उल्लेख आहे.

या गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द झाल्यास मुंबई, उत्तर प्रदेश तसेच अन्य राज्यांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटदरात बचत करता येऊ शकते.

अनेक महत्त्वाच्या गाड्यांमध्ये बदलाचे नियोजन

मध्य रेल्वेच्या प्रस्तावित बदलांमध्ये सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, एलटीटी-तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस, एलटीटी-करमळी एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस यांसह अन्य गाड्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

सुपरफास्ट दर्जा रद्द झाल्यानंतर अतिरिक्त शुल्क वाचणार असले, तरी प्रत्यक्ष तिकीटदरात किती रुपयांची कपात होईल, हे संबंधित गाडीची श्रेणी आणि लागू भाडेदरांवर अवलंबून राहणार आहे.

अधिकृत घोषणेकडे प्रवाशांचे लक्ष

या बदलांची अंमलबजावणी १ जानेवारी २०२७ पासून अपेक्षित असल्याने मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांनी आरक्षण करताना सुधारित तिकीटदर आणि रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक तपासणे आवश्यक ठरणार आहे.विशेषतः जळगाव आणि भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या निर्णयामुळे किती आर्थिक फायदा होणार, हे अंतिम निर्णय आणि सुधारित तिकीटदर जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande