सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणानंतर गंगा-गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले होणार
Ganga Godavari temple to open today
Ganga Godavari temple


सातशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा; बारा वर्षांनंतर मंदिराचे उघडणार दरवाजे

साधू-महंतांच्या हस्ते जलाभिषेक व ध्वजारोहण

नाशिक, ३० ऑक्टोबर (हिं.स.) : नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. या कुंभमेळ्याशी थेट संबंध असलेले रामकुंड परिसरातील श्री गंगा-गोदावरी मंदिरही दर बारा वर्षांनी भाविकांसाठी खुले केले जाते. कुंभमेळ्याची ध्वजपताका फडकविल्यानंतर पुढील वर्षभर म्हणजेच सिंहस्थ पर्वाचा कालावधी संपेपर्यंत हे मंदिर खुले राहते. यंदा ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या मुहूर्तावर साधू-महंतांच्या हस्ते जलाभिषेक आणि ध्वजारोहण करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

सातशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा

रामतीर्थ अर्थात रामकुंडाच्या उत्तरेस असलेले श्री गंगा-गोदावरी मंदिर पुरोहितांच्या नोंदी आणि ऐतिहासिक माहितीनुसार सुमारे ७०० वर्षांची परंपरा लाभलेले असल्याचे सांगितले जाते. भारतातील अशा प्रकारचे हे एकमेव मंदिर मानले जाते. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिरात गंगा, गोदावरी आणि गौतम ऋषी यांच्या मूर्ती विराजमान आहेत.

पूर्वी गौतम ऋषींची मूर्ती उघड्यावर असल्याने ऊन-पावसाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर इ.स. १७७५ मध्ये गोपिकाबाईंनी या ठिकाणी सभामंडप उभारून दिला. त्यामुळे मूर्तीचे संरक्षण झाले, अशी माहिती मंदिराचे पुजारी कमलाकर जोशी यांनी दिली.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे सुशोभीकरण

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण रामकुंड परिसराचा कायापालट करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गंगा-गोदावरी मंदिरातही विविध कामे करण्यात आली आहेत. मंदिरातील फरशा बदलण्यात आल्या असून, रंगरंगोटी आणि पाणीगळती रोखण्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

मंदिरावर ध्वजारोहण करण्यासाठी आवश्यक व्यवस्था तसेच वर-खाली जाण्यासाठी लोखंडी जिना आणि पायऱ्यांची कामे अद्याप प्रतीक्षेत आहेत. ध्वजारोहणाच्या वेळी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी या सुविधांची पूर्तता होणे आवश्यक आहे.

देशभरातील साधू-महंत आणणार पवित्र जल

कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या दिवशी देशभरातून येणारे साधू-महंत आपापल्या भागातून पवित्र जल घेऊन मंदिरात येतील. या जलाने गंगा-गोदावरी मंदिरातील मूर्तींचा अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर विधिवत ध्वजारोहण होऊन मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल. सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी संपेपर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येणार आहे.

वर्षातून दोन दिवसच मिळते दर्शन

सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी वगळता हे मंदिर वर्षभर बंद ठेवले जाते. मात्र, मंदिराबाहेरील देवीच्या पादुकांचे पूजन नियमितपणे केले जाते. वर्षातून गंगा दशहरा आणि त्रिपुरी पौर्णिमा अर्थात देवदिवाळी या दोन दिवशी मंदिर पहाटे पाच वाजता पूजा-अर्चा आणि उत्सवासाठी उघडले जाते. रात्री १२ वाजता पुन्हा मंदिर बंद करण्यात येते, अशी माहिती पुजारी कमलाकर जोशी यांनी दिली.

गोदावरीच्या पुराचाही मूर्तींना धोका नाही

शेकडो वर्षांपासून गोदावरी नदीच्या पुराचा अनुभव या मंदिराने घेतला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याची रचना विशेष पद्धतीने करण्यात आली असून, नदीचे पाणी कितीही दिवस गाभाऱ्यात राहिले तरी मूर्तींची झीज किंवा अन्य नुकसान होत नाही, असे मंदिराचे पुजारी सांगतात.

कुंभमेळ्याशी थेट संबंध असल्याने या मंदिराशेजारीच ध्वजारोहणाचा मुख्य स्तंभ उभारण्याचा आग्रहही धरण्यात आला होता. मात्र, तसे झाले नाही. आता ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहणानंतर सातशे वर्षांची परंपरा लाभलेले हे ऐतिहासिक मंदिर पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुले होणार असल्याने नाशिकच्या धार्मिक परंपरेत महत्त्वपूर्ण पर्वाला सुरुवात होणार आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande