उद्योगपती माजी खा. आर.के. सिन्हा यांचे निधन; उद्या पाटण्यात होणार अंत्यसंस्कार
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर (हिं.स.) - राज्यसभेचे माजी सदस्य, भाजपचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक आणि प्रसिद्ध उद्योगपती आर.के. सिन्हा यांचे शुक्रवारी नोएडातील सेक्टर ९२ स्थित त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. शहरातील अनेक दिग्गज राजकीय व्यक्ती आणि समाजसेवकांन
RK Sinha


नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर (हिं.स.) - राज्यसभेचे माजी सदस्य, भाजपचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक आणि प्रसिद्ध उद्योगपती आर.के. सिन्हा यांचे शुक्रवारी नोएडातील सेक्टर ९२ स्थित त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. शहरातील अनेक दिग्गज राजकीय व्यक्ती आणि समाजसेवकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान त्यांचे पार्थिव विमानाने पाटण्याला नेण्यात आले. त्यानंतर शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

आर. के. सिन्हा यांच्या निकटवर्ती रत्ना सिन्हा यांनी सांगितले की, त्यांना जानेवारी २०२५ मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. उपचारांसाठी त्यांना सिंगापूरला नेण्यात आले होते. तिथे उपचार पूर्ण झाल्यानंतर ते नोएडातील सेक्टर ९२ येथील आपल्या निवासस्थानी परतले होते. दरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज संध्याकाळी दिल्लीहून पाटण्याला नेण्यात आले. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव पाटण्यातील पाटलीपुत्र येथील 'अन्नपूर्णा भवन'मध्ये ठेवले जाईल, जिथे नागरिक त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहू शकतील. दुपारनंतर 'अन्नपूर्णा भवन' येथून अंत्ययात्रा निघून दीघा घाटाकडे प्रस्थान करेल.

बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील बहियारा गावचे रहिवासी असलेले रवींद्र किशोर सिन्हा यांचा जन्म २२ सप्टेंबर १९५१ रोजी झाला होता. डॉ. सिन्हा हे 'एसआयएस ग्रुप'चे (SIS Group) संस्थापक आणि अध्यक्ष होते. राजकीय आणि औद्योगिक अशा दोन्ही क्षेत्रांत त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. भाजपच्या सुरुवातीच्या काळापासून पक्षाशी जोडलेले डॉ. सिन्हा यांनी दीर्घकाळ पक्ष आणि संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात पत्रकारितेतून केली होती. राज्यशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतलेल्या आर. के. सिन्हा यांना लेखनाची विशेष आवड होती. पत्रकारितेच्या कार्यकाळात त्यांनी 'जन आंदोलन' नावाचे एक पुस्तक लिहिले, ज्यामध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी चळवळीचा सविस्तर वृत्तांत दिला आहे. त्यांनी २०१६ ते २०२1 या काळात 'हिंदुस्थान समाचार' या वृत्तसंस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande