
ठाणे, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। प्रशासन लोकांच्या दारी यावे, तक्रारींचे निवारण एका खिडकीत व्हावे आणि डिजिटल साधनांचा प्रत्यक्ष उपयोग नागरिकांना जाणवावा, या त्रिसूत्रीवर आधारलेले ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १’ ठाणे तहसील कार्यालयाने जाहीर केले आहे. महसूल विभागाच्या दैनंदिन सेवांभोवती फिरणाऱ्या नागरिकांच्या अडचणींना तात्काळ उत्तर देण्याचा हा प्रयत्न असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले.
‘लोकाभिमुख प्रशासन’ हा या अभियानाचा गाभा आहे. महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून प्रलंबित प्रकरणांचा शंभर टक्के निपटारा करण्यावर भर देण्यात आला आहे. फेरफार प्रकरणांचे निकाल, ७/१२ व ८अ उताऱ्यांचे डिजिटल वितरण, ७/९२ दुरुस्त्या आदी कामे शिबिरस्थळीच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘सिंगल विंडो’ पद्धतीने अर्ज स्वीकृती, पडताळणी आणि तात्काळ सेवा वितरण अशी एकाच छताखाली व्यवस्था उभी करण्यात येणार आहे.
उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमी लेयर दाखल्यांसह लोकसेवा हक्कांतर्गत येणाऱ्या प्रमाणपत्रांचाही निपटारा या शिबिरांत होणार आहे. ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ प्रणालीचा प्रभावी वापर करून डिजिटल ७/१२ व ८अ उतारे त्वरित देण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
ठाणे तहसील कार्यक्षेत्रातील ठाणे, बेलापूर, मुंब्रा, बाळकूम व दहिसर या मंडळांमध्ये टप्प्याटप्प्याने शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. ७ मार्च २०२६ रोजी ठाणे, १४ मार्च रोजी बेलापूर, १७ एप्रिल रोजी मुंब्रा, ८ मे रोजी बाळकूम आणि १५ मे रोजी दहिसर येथे शिबिरे होतील. त्यानंतर तालुकास्तरीय समारोप शिबिराचे आयोजन तहसील ठाणे येथे होणार आहे.
प्रशासकीय जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या असून तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्याकडे समन्वय व पर्यवेक्षणाची सूत्रे राहतील. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर स्थानिक नियोजन, अर्ज स्वीकृती, कागदपत्र पडताळणी आणि सेवा अद्ययावत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अ-१ ते अ-६ या नमुन्यांद्वारे दैनंदिन प्रगती अहवाल सादर करण्यासाठी ‘मॉनिटरिंग डॅशबोर्ड’ची यंत्रणाही उभारण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपल्या संबंधित मंडळाच्या तारखेला आवश्यक मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतींसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महसूल कार्यालयांच्या दारात रेंगाळणाऱ्या अर्जांना ‘समाधान’ाचा मार्ग दाखवण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी ठरेल, हे पुढील दोन महिन्यांत स्पष्ट होईल; मात्र लोकाभिमुखतेचा हा प्रयोग ठाणे तहसील प्रशासनासाठी एक कसोटी ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर