
अमरावती, 16 मार्च (हिं.स.)
महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी पंतप्रधान पोषण (मध्यान्ह भोजन) योजना एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी तयार होणाऱ्या जेवणासाठी आवश्यक असलेल्या गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी विविध स्वयं-मदत गटांकडून करण्यात आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने भारत पेट्रोलियम कार्पोरेशन ली. (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन ली. या तेल कंपन्यांना पत्र लिहून पंतप्रधान पोषण योजनेसाठी एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याची विनंती केली आहे. सध्याच्या जागतिक स्तरावरील युद्धसदृश परिस्थितीमुळे १० मार्चपासून काही ठिकाणी एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याची माहिती संचालनालयाला मिळाली आहे.राज्य प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत राज्यातील केंद्रीय स्वयंपाकघर आणि शाळांना दरमहा सुमारे १.६० ते १.७० लाख एलपीजी सिलिंडरची आवश्यकता भासते. राज्यातील सुमारे ८६ हजारांहून अधिक शाळांमधील अंदाजे ९५ लाख विद्यार्थ्यांना दररोज मध्यान्ह भोजन दिले जाते. यापैकी ७५ हजारांहून अधिक शाळांमध्ये स्वयंपाकासाठी एलपीजीचा वापर केला जातो.जर एलपीजीचा तुटवडा कायम राहिला तर या योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या अन्नपुरवठ्यावर परिणाम होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहारापासून वंचित राहावे लागू शकते, अशी भीती शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी