
परभणी, 16 मार्च (हिं.स.)। संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पूर्णा तालुक्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तालुका स्तरावरील समितीच्या अध्यक्षपदी सैनाजी बाबाराव माठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून पूर्णा तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या शिफारशीवरून तसेच पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीच्या अशासकीय अध्यक्षपदी सैनाजी बाबाराव माठे यांची निवड करण्यात आली आहे. सैनाजी माठे हे आ. गुट्टे काका मित्र मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग असून विविध उपक्रमांमध्ये ते नेहमी पुढाकार घेत असल्याने त्यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे.
संजय गांधी निराधार योजना ही राज्य शासनाची महत्त्वाची योजना असून विधवा, अपंग, निराधार व गरजू नागरिकांना आर्थिक मदत देण्याचे काम या योजनेद्वारे केले जाते. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर समिती कार्यरत असते. सैनाजी माठे यांच्या नियुक्तीमुळे पूर्णा तालुक्यातील निराधार व गरजू लाभार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक वेगाने काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis