
परभणी, 16 मार्च (हिं.स.)।
शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत हादगाव बु. येथे समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी पंचायत समिती सभापती सुनिताताई डुकरे, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार हांदेशवार, गटविकास अधिकारी ऋषिकेश सावंत, कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरादरम्यान नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी दिली. तसेच पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॅक्टरसह विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत हादगाव बु. यांच्या वतीने महिला बचत गटांना शिलाई मशीनचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांना स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या समाधान शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांबाबत मार्गदर्शन घेतले. शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे मोठे महत्त्व असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis