
नांदेड, 16 मार्च (हिं.स.)।
बिलोली शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने बिलोली शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण १५ तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करून ६४०० रुपये दंड वसूल केला.
सदर कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शीतल चातुरे, डॉ.
संजीवनी जाधव, डेंटल सर्जन डॉ. पूजा काळे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, समुपदेशक सुंदर चव्हाण, बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले आदींचा सहभाग होता. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis