
लातूर, 17 मार्च (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे व्यावसायिक एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात तुटवडा जाणवत असला तरी लातूर जिल्ह्यात घरगुती वापरासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांतून घरगुती गॅसच्या तुटवडीबाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सर्व गॅस एजन्सी धारकांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आणि कोणत्याही तक्रारी येऊ नयेत याबाबत कडक सूचना देण्यात आल्या. काळ्या बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १० पथके तैनात केली असून, दोषींवर कठोर कारवाई सुरू आहे.
नागरिकांच्या तक्रारींसाठी विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून, हेल्पलाइन क्रमांक ९८९००८४१६८ उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय वसतीगृहे, हॉस्टेल, रुग्णालये यांसारख्या अत्यावश्यकसंस्थांना व्यावसायिक गॅस आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित सेल्स ऑफिसर यांना सूचना देण्यात आल्या असून, त्यानुसार पुरवठा सुरळीत सुरू आहे.नागरिकांना काटेकोरपणे जिल्हा प्रशासनाने गॅसचा वापर आणि आवश्यकतेनुसारच करण्याचेआवाहन केले आहे. गॅस वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. अनेकदा गॅस चालू ठेवून काहीही शिजवले जात नसते, अशा प्रकारे वाया घालवणे टाळावे. जास्तीचे पदार्थ तयार करणे किंवा अनावश्यक स्वयंपाक टाळावा. घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत अफवांना बळी पडून पॅनिक होऊ नये. नोंदणी केल्यानंतर निश्चितकालावधीत सिलेंडर उपलब्ध होणार असल्याने संयम बाळगावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणी गॅसची साठेबाजी किंवा काळा बाजार करत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis