
रायगड, 16 मार्च (हिं.स.)। दखलपूर्व तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद निपटारा करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत संपन्न झाली.
अलिबाग येथील न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र द. सावंत यांच्या हस्ते लोक अदालतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी न्यायिक अधिकारी, अलिबाग वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, सचिव अमित देशमुख तसेच रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील न्यायिक अधिकारी, वकील आणि पक्षकार मोठ्या संख्येने दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश तेजस्विनी निराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोक अदालतीत वादपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी एकूण १ लाख ४१ हजार ५१४ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७८ हजार ३२४ वादपूर्व आणि ६ हजार ४९३ प्रलंबित अशी एकूण ८४ हजार ८१७ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण ३६ कोटी ४६ लाख ६१ हजार ४२९ रुपयांची तडजोड करण्यात आली आहे.
दरम्यान, लोक अदालतीमुळे कौटुंबिक वाद मिटून रायगड जिल्ह्यातील सहा जोडप्यांचा संसार पुन्हा जुळला. पेण, पाली, पनवेल आणि अलिबाग येथील या जोडप्यांनी सामंजस्याने वाद मिटविल्याने त्यांचे वैवाहिक जीवन पुन्हा सुरळीत झाले.
तसेच ६० मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड होऊन पीडित पक्षकारांना एकूण ५ कोटी ६८ लाख ७९ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये २७ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते.
ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी न्यायिक अधिकारी, वकील, कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच सर्व पक्षकारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र द. सावंत यांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)