
रायगड, 16 मार्च (हिं.स.)। पनवेल शहरातील पटेल मोहल्ला परिसरातून हरवलेली एक मुलगी नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुखरूप सापडून पोलिसांच्या माध्यमातून तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पटेल मोहल्ला परिसरातून ही मुलगी हरवली होती. काही नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ नगरसेवक राजू सोनी यांना फोनद्वारे याची माहिती दिली. त्यानंतर मुलीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.
शोध घेत असताना संबंधित मुलगी मिरची गल्ली परिसरात असल्याचे समजले. त्यावेळी नगरसेवक राजू सोनी आणि त्यांचे सहकारी मंदार देसाई यांनी तत्काळ तेथे जाऊन मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर तिला आपल्या वाहनातून थेट पनवेल शहरी पोलीस ठाणे येथे आणून पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या आईने आधीच पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तिच्या आईशी संपर्क साधून तिला पोलिस ठाण्यात बोलावले आणि मुलीला सुखरूप तिच्या आईच्या स्वाधीन केले.
या वेळी नितीन ठाकरे , पोलिस निरीक्षक, पनवेल शहर पोलिस ठाणे तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी नगरसेवक राजू सोनी आणि मंदार देसाई यांच्या तत्परतेबद्दल आभार व्यक्त केले. तसेच मुलीच्या आईनेही त्यांचे मनापासून आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)