
रायगड, 16 मार्च (हिं.स.)। आगामी ऑलिंपिक, जागतिक तसेच आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना अधिकाधिक पदके मिळवून देता यावीत, या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने “मिशन लक्षवेध” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षण व्यवस्था, पायाभूत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्त्र, स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना प्रोत्साहन व करिअर मार्गदर्शन अशा विविध घटकांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या अंतर्गत मुंबई विभाग स्तरावर लॉन टेनिस, टेबल टेनिस, शूटिंग आणि वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांसाठी क्रीडा निपुणता केंद्र (स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर) सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार असून त्यासाठी विभागातील विविध ठिकाणी निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. अर्ज ऑनलाईन तसेच गुगल फॉर्म या दोन्ही माध्यमांतून भरावा.
ई-मेल missionlakshvedhamumdiv@gmail.com
गुगल फॉर्म : https://forms.gle/2f7yPkikdUBKNf7fA निवड चाचणीच्या दिवशी अर्जदारांनी मूळ कागदपत्रे, त्याच्या सत्यप्रती तसेच ३ आयकार्ड साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
वेटलिफ्टिंगची निवड चाचणी ६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता तालुका क्रीडा संकुल, कोपरी (ठाणे) येथे होणार आहे. लॉन टेनिसची चाचणी ७ एप्रिल रोजी महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन, मुंबई उपनगर येथे, शूटिंगची चाचणी ८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता कामगार कल्याण मंडळ, कफ परेड (मुंबई) येथे तर टेबल टेनिसची चाचणी ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता नवी मुंबई स्पोर्ट्स अँड सामाजिक विकास मंडळ, पनवेल येथे होणार आहे.
या निवड प्रक्रियेसाठी खेळाडूंची वयोमर्यादा २५ वर्षांखालील असून राज्यस्तरावर पदकप्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतलेला असणे आवश्यक आहे. इच्छुक खेळाडूंनी ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)