सहा महिन्यांत ४६ कोटींच्या रस्त्यांचे पितळ उघडे; उद्धवसेनेचा गांधीगिरीतून भ्रष्टाचारावर घणाघात
अकोला, 16 मार्च (हिं.स.)। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल ४६.४० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची अवस्था अवघ्या सहा महिन्यांतच दयनीय झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या भेगा, उभे तडे आणि उखडलेले काँक्रीट दिसू
Photo


अकोला, 16 मार्च (हिं.स.)।

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल ४६.४० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची अवस्था अवघ्या सहा महिन्यांतच दयनीय झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या भेगा, उभे तडे आणि उखडलेले काँक्रीट दिसून येत असल्याने या कामातील दर्जाहीनता आणि संभाव्य भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेच्या वतीने सोमवारी गांधीगिरी आंदोलन करत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता निलेश वानखडे यांचा शाल व श्रीफळ देऊन उपरोधिक ‘सत्कार’ करण्यात आला.

उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनातून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका करण्यात आली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन रस्त्यांची कामे सुमारे सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाली होती. मात्र आज या रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून काँक्रीट उखडलेले दिसत आहे. परिणामी दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच कोणताही अतिरिक्त निधी न देता त्याच्याकडूनच गुणवत्तापूर्ण पद्धतीने रस्ते नव्याने करून घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख गोपालराव दातकर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख विकासराव पागृत, उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र विसपुते, शहरप्रमुख आशिष गावंडे (अकोला पश्चिम), शहरप्रमुख राहुल कराळे (अकोला पुर्व), मनपा गटनेता विजय इंगळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

तीनही रस्त्यांची गुणवत्ता उघड!

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बाभुळगाव ते गुडधी-अलियाबाद-घुसर हा १०.७५ कि.मी. लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता सुमारे २१ कोटी रुपयांत बांधण्यात आला. तसेच उगवा ते घुसर हा ६ कि.मी. लांबीचा रस्ता १२ कोटी रुपयांच्या खर्चातून, तर घुसर ते दोनवाडा हा ७.१० कि.मी. लांबीचा रस्ता १३.६७ कोटी रुपयांत उभारण्यात आला. अवघ्या सहा महिन्यात सदर तीनही रस्ते दर्जाहीन असल्याचे समोर आले आहे.

घुसर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतची तक्रार उपजिल्हाप्रमुख विकास पागृत यांनी संबंधित विभागाकडे केली होती. त्यावर या विभागाने कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई न करता कंत्राटदाराच्या माध्यमातून उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात अकोटफाईल पोलीस ठाण्यात खोटी तक्रार करण्यात आली होती. वर्तमान स्थितीत उपरोक्त रस्ते कामातील भ्रष्टाचार उघड पडल्याने ती तक्रार पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठीच केल्याचे समोर आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande