
रत्नागिरी, 16 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मंडणगड तालुक्यातील भिंगळोली गटातील शिवसेनेच्या अस्मिता केंद्रे यांची, तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी पहिल्यांदाच मंडणगड तालुक्याला जिल्हा परिषदेचे सर्वोच्च अध्यक्षपद मिळाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आज या नावांची घोषणा केली.
अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण ५६ जागांपैकी शिवसेनेने ४१ जागा शिवसेनेने जिंकल्या. भाजपला ४ जागा मिळाल्या असून, मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने ५ जागा जिंकल्या आहेत. यामुळे महायुतीचे संख्याबळ ५० वर पोहोचले आहे.
अध्यक्षपदी निवड झालेल्या अस्मिता केंद्रे महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागेवर निवडून आल्या आहेत. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातील भिंगळोली गटातून त्या विजयी झाल्या आहेत. त्या अनुभवी सदस्य असून, यापूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये असतानाही जिल्हा परिषदेत उत्तम कामगिरी केली होती. वर्षभरापूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
उपाध्यक्षपदी निवड झालेले विलास चाळके यांनी उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. संघटन कौशल्य आणि प्रशासकीय कामाची जाण यामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेतर्फे नवनियुक्त अध्यक्षांना सव्वा वर्षाचा (१५ महिने) कालावधी दिला जाणार आहे. या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि आरोग्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर भर दिला जाईल. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातून पहिल्यांदाच अध्यक्ष मिळाल्याने मंडणगड आणि दापोली परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी