
गॅस पुरवठ्याबाबत प्रतिनिधीमंडळाची भेट
छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.) : मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे एलएनजी आणि एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचा फटका मराठवाड्यातील उद्योगांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर आणि मराठवाडा असोसिएशन ऑफस्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीक्लचर (मासिआ) यांच्या प्रतिनिधीमंडळाने माजी खासदार डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन उद्योगांच्या अडचणींबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
या प्रतिनिधीमंडळात सीएमआयएचे अध्यक्ष Utsav Machhar, उपाध्यक्ष Atharveshraj Nandavat, मानद सचिव मिहीर सौंदालगेकर तसेच मासिआचे उपाध्यक्ष राहुल मोगले यांचा समावेश होता.
प्रतिनिधीमंडळाने मराठवाड्यातील उद्योगांना आवश्यक असलेल्या एलएनजी व एलपीजी पुरवठ्याची सध्याची परिस्थिती, तसेच त्यामुळे उत्पादनावर होत असलेला परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. गॅस टंचाईमुळे उद्योगांचे कामकाज विस्कळीत होत असून उत्पादन खर्च वाढत असल्याचीही बाब त्यांनी मांडली.
यावेळी डॉ. भागवत कराड यांनी उद्योगांच्या अडचणी समजून घेत केंद्र सरकारच्या स्तरावर आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच पुढील आठवड्यात केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हर्षदीप सिंग पुरी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीएमआयएतर्फे डॉ. कराड यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले असून या प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis