मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावर चक्क वाघाला घेरले, वनगुन्हा दाखल
चंद्रपूर, 16 मार्च (हिं.स.) : मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावर काही नागरिकांनी चक्क वाघाला घेरून त्याचे व्हिडिओ चित्रित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने गंभीर दखल घेत वनगुन्हा दाखल केल
मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावर चक्क वाघाला घेरले, वनगुन्हा दाखल


चंद्रपूर, 16 मार्च (हिं.स.) :

मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावर काही नागरिकांनी चक्क वाघाला घेरून त्याचे व्हिडिओ चित्रित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने गंभीर दखल घेत वनगुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी मोहर्ली-पद्मापूर मार्गावर काही वाहनचालकांनी रस्त्यावर वाहने थांबवून वाघाचे व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. काहीजण तर वाहनांमधून खाली उतरून वाघाचा रस्ता अडवत त्याचा पाठलाग करत व्हिडिओ काढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने चौकशी सुरू केली आहे. वाघाच्या भ्रमणमार्गावर वाहने थांबवणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असून रस्त्यावर उतरून वाघाचा पाठलाग करणाऱ्यांविरोधात वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करत आहेत. व्हिडिओमधील आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

दरम्यान, व्हिडिओमधील व्यक्तींची ओळख पटल्यास 9834689541 या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच अशा प्रकारच्या घटना टाळाव्यात व वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात अडथळा आणू नये, असे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आले आहे.----------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande