आरोपांचा रणसंग्राम कोर्टात; तटकरे विरुद्ध थोरवे प्रकरण तापले
 ६५ कोटी ३ हजार रुपयांचा मानहानीचा दावा
तटकरे विरुद्ध थोरवे


रायगड, 16 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांची धग वाढत असतानाच आता हा संघर्ष थेट न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात तब्बल ६५ कोटी ३ हजार रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. हा दावा रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

खोपोली येथे मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर २७ डिसेंबर २०२५ रोजी आमदार महेंद्र थोरवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रायगडमध्ये “रक्तरंजित राजकारण सुरू आहे” असा उल्लेख करत काही गंभीर आरोप केल्याचा दावा करण्यात आला आहे. या विधानातून खासदार सुनील तटकरे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचे दाव्यात नमूद केल्याची माहिती आहे.

दरम्यान, सुनील तटकरे यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असल्याचे सांगितले जात आहे. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत आपण विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून अशा प्रकारचे आरोप निराधार व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. या विधानांमुळे समाजात आपली प्रतिमा गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचा चुकीचा संदेश पसरल्याचा उल्लेखही त्यांनी न्यायालयात केला असल्याचे समजते.

या दाव्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेले आरोप खोटे व मानहानीकारक असल्याचे घोषित करावे, संबंधित व्हिडिओ व सामग्री सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवावी, भविष्यात अशा प्रकारची विधाने करण्यास मनाई करावी तसेच ६५ कोटी ३ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढे या वादाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande