शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे - अशोक चव्हाण
नांदेड, 16 मार्च (हिं.स.)। भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. तो प्रत्येकाच्या ताटात अन्न पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. उत्पादन वाढीसोबतच आर्थिक स्तर उंचावण्यासाठ
Q


नांदेड, 16 मार्च (हिं.स.)।

भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. तो प्रत्येकाच्या ताटात अन्न पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. उत्पादन वाढीसोबतच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

नांदेड येथे आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सव व प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास खासदार रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत प्रगतशील शेतकरी, नागरिक आदी मोठया संख्येने उपस्थित होते. महोत्सवात विविध विषयांवरील शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद, चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषी मालाचे प्रदर्शन तसेच खरेदीदार-विक्रेता संमेलन होणार आहे.

खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, काळानुसार शेती करताना शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आधुनिक व नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करावा. शेतीत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढीस मदत होईल व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. शासन शेतकऱ्यांसाठी विविध भरीव योजना राबवत असून नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन विकसित भारत संकल्पनेतून नांदेड जिल्ह्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

संयुक्त राष्ट्र संघटनेने 2026 हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात महिलांचे अतुलनीय योगदान आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले. या कृषी महोत्सव व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी विभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande