
पुणे, 16 मार्च (हिं.स.)। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या वावड्या उठल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणा हलवून अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. शहरात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत आहे, त्यामुळे नागरिकांनी विरोधकांच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात गॅस टंचाई असल्याच्या चर्चांमुळे गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते. काही ठिकाणी गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार शंकर जगताप यांनी अन्न पुरवठा परिमंडळ अधिकारी विजयकुमार क्षीरसागर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत आमदारांनी शहरातील गॅस पुरवठ्याची सद्यस्थिती, साठवणूक आणि वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत असेल किंवा गॅसचा काळाबाजार होत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. गॅस सिलिंडरचा तुटवडा भासणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु