
सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)।
व्यावसायिक वापराच्या गॅस टंचाईचा परिणाम दूध बाजारावरही होत असून, दुधाच्या मागणीत घट झाल्याने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावरच दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापराच्या गॅसच्या पुरवठ्यात टंचाई निर्माण झाली आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी चहा कॅंटीन, मेस व खानावळी अडचणीत आल्या असून, काही ठिकाणी त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी होणारी दैनंदिन दूध खरेदी कमी झाली आहे.याचबरोबर गॅस टंचाईचा परिणाम लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांवरही झाला आहे. अलीकडील काळात समारंभांमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे त्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी दुधाची मागणी घटली असून, सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिराजवळ भरणाऱ्या सुट्या दूध बाजारातही त्याचे पडसाद उमटले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड