
पुणे, 16 मार्च (हिं.स.)।विद्यापीठात गॅसटंचाईमुळे फूडमॉल तसेच अनेक खानावळी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर, विद्यापीठाच्या कुलसचिवांनी पत्र काढत गॅसपुरवठ्याबाबत निश्चिंत राहण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, विद्यार्थी संघटनांनी मात्र विद्यापीठाने काय उपाययोजना केल्या? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात सीएनजी आणि एलपीजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती वापरासाठी पीएनजी पुरवठा टिकवून ठेवण्याची काळजी म्हणून सरकारने औद्योगिक क्षेत्राला गॅसपुरवठा कमी केला आहे. संबंधित सर्व परिस्थितीचा विपरीत परिणाम जवळपास 5 हजार रहिवासी विद्यार्थी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील खानावळी व उपाहारगृहांवर झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु