
रायगड, 16 मार्च (हिं.स.)। कर्जत शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता शहरातून अवजड वाहनांच्या दिवसा प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्गावरून कर्जत शहराच्या मार्गे खोपोली, कशेळे तसेच इतर परिसराकडे जाणाऱ्या जड आणि अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते, चौक तसेच रेल्वे फाटक परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अवजड वाहनांना शहरात दिवसा प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आदेशानुसार शुक्रवार ते रविवार या कालावधीत सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहने कर्जत शहरात प्रवेश करू शकणार नाहीत. मात्र दूध, पेट्रोल-डिझेल, गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला तसेच पाणी वाहतूक करणाऱ्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.
शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कर्जत शहरात शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानक आणि पर्यटन स्थळे असल्याने येथे नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.
दरम्यान, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)