
परभणी, 16 मार्च (हिं.स.)। नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर सर्व विषयाच्या अभ्यास मंडळानी आमूलाग्र बदल करणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने इतिहास विषयाचे अध्ययन, अध्यापन करत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारीत अभ्यासक्रम ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांना मूल्याशिक्षणाबरोबरच जीवनात उभे करणारे अभ्यासक्रम असावेत, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी अभिनव उपक्रमासोबतच दर्जेदार अभ्यासक्रम तयार करावेत. त्यासाठी अभ्यासक्रम वेळोवेळी अद्ययावत करावेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
येथील शारदा महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व शारदा महाविद्यालय इतिहास विभागाच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. आत्माराम शिंदे व इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राहुल वरवंटीकर उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार उपस्थित होते.
प्रमुख अतिथी प्रा. डॉ. शिंदे यांनी स्थानिक प्रादेशिक इतिहासासोबतच अर्कियालोजी व पर्यटनासारखे अभ्यासक्रम दिले तर विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होतील असे मत प्रतिपादन केले.त्यानंतर अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. बबन पवार यांनी इतिहास विषयाची कार्यशाळा घेण्याचा उद्देश सांगत इतिहास विषयाचे महत्व प्रतिपादन केले. यावेळी प्रा. डॉ. ओमशिवा लिगाडे व डॉ. राहूल वरवंटीकर लिखित ‘संग्रालय शास्त्र’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर इतिहास अभ्यास मंडळाच्या सर्व सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील इतिहास विषयाचे अनेक अभ्यासक, प्राध्यापक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis