
अमरावती, 16 मार्च (हिं.स.) । अमरावती शहराच्या जुना बायपास मार्गावरील एमआयडीसी चौकात रविवारी मध्यरात्री भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बापलेकीचा मृत्यू झाला. हिट अँड रनचा हा प्रकार आहे. गजानन श्रीराम माकोडे (वय ५२) आणि त्यांची कन्या सपना गजानन माकोडे (वय २४) दोघेही रा. मायानगर अशी मृतकांची नावे आहेत. त्यांची दुसरी मुलगी प्रियंका ही गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात झाल्यानंतर कारचालकाने पळ काढला, मात्र सोमवारी पहाटे त्याने स्वतःहून राजापेठ पोलिस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले.
माहितीनुसार, गजानन माकोडे हे पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये बसून देण्यासाठी रात्री १२ वाजता त्यांच्या दोन्ही मुलींना सपना (२४) आणि प्रियंका (२२) यांना घेऊन दुचाकीने एमआयडीसी चौकात पोहोचले. त्याचवेळी नांदगाव पेठकडून बडनेराच्या दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी जखमींना तातडीने इर्विन रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून गजानन माकोडे आणि त्यांची मोठी मुलगी सपना यांना मृत घोषित केले. धाकटी मुलगी प्रियंका हिला पुढील उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. हिट अँड रान कार चालकाविरुद्ध कलम २८१, १०६(१), १२५(B) बीएनएस आणि मोटार वाहन कायदा कलम १३४, १८५ अंतर्गत गुन्हा (१७७/२०२६) नोंदवण्यात आला आहे. अपघातग्रस्त कारचा चालक स्वतः पोलिस स्टेशनला हजर झाला असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
---------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी