
नांदेड, 16 मार्च (हिं.स.)।
नांदेड येथील धान्य महोत्सवात एकूण 125 स्टॉल लावण्यात आले असून जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग आहे. या वेळी 36 प्रगतीशील शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महोत्सवाच्या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मूग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले तसेच गूळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी यांसारखी सेंद्रीय उत्पादने उपलब्ध आहेत. मध, गुळाचा पाक, महिला बचत गटांची चटणी, लोणचे, पापड, कुरडई, टरबूज, खरबूज यांसारखी फळे व विविध भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय जात्यावरची सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्वारी, सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्या, रानफळे तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले लाकडी घाण्याचे करडई, भुईमूग, जवस व तिळाचे तेल, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, केळीचे वेफर्स, डिंक व बिब्याची गोडंबी यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात भेट देवून शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी त्यांच्या प्रास्ताविकात केले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis