उमरगा पाटी येथे भीषण अपघातात पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू
लातूर, 16 मार्च (हिं.स.)। जळकोट तालुक्यातील उमरगा पाटी येथे भीषण अपघात झाला असून मुखेडकडून येणाऱ्या एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह थांबलेल्या पिता-पुत्राला जोरदार धडक दिली. या अपघातात उमरगा (रेतू) ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अंकुश
अपघात


लातूर, 16 मार्च (हिं.स.)।

जळकोट तालुक्यातील उमरगा पाटी येथे भीषण अपघात झाला असून मुखेडकडून येणाऱ्या एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह थांबलेल्या पिता-पुत्राला जोरदार धडक दिली. या अपघातात उमरगा (रेतू) ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अंकुश विश्वनाथ गीते (वय, ५०) आणि त्यांचा तरुण मुलगा ओमकार अंकुश गीते (वय, २४) या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश गीते आणि त्यांचा मुलगा ओमकार हे दोघे आपल्या शेतातील काम आटोपून घराकडे जात होते. उमरगा पाटीजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून ते थांबले असताना, मुखेडच्या दिशेने येणाऱ्या भरधाव मारुती कारने (क्र. MH 24-2294) त्यांना भीषण धडक दिली. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात जाऊन कोसळली. या अपघात बाप-लेक गंभीर जखमी झाले.

अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी बाप-लेकाला तातडीने हाडोळती येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहमदपूर येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, अहमदपूर येथील रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. धडक दिल्यानंतर कार खड्ड्यात पडली असली तरी, कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे आतील प्रवासी सुखरूप बचावले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी कारचालकाला जागीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनेची माहिती मिळताच जळकोट पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. मयत अंकुश गीते हे उमरगा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा होता. कर्तबगार वडील आणि घराचा आधार असलेल्या तरुण मुलाचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande