
रत्नागिरी, 16 मार्च, (हिं. स.) : चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपकेंद्र (मुंबई विद्यापीठ) येथे पर्यावरणीय दृष्टिकोन : शिक्षण-उद्योग क्षेत्रांतील एकात्मिक संवाद या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी, १७ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यात संवाद वाढावा, तळागाळातील पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळावी तसेच शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या विविध संकल्पनांवर चर्चा व्हावी, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि सहभाग घेणाऱ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणा देण्याचाही प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान, शैक्षणिक संशोधन आणि क्षेत्रीय अभ्यासातून मिळालेली माहिती, उद्योग क्षेत्रातील शाश्वत पद्धतींचे अनुभव तसेच परस्परसंवाद आणि ज्ञानविनिमयाचे सत्र आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमात उद्योजक दीपक गद्रे, आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे संस्थापक-संचालक व उद्योजक नंदकुमार पटवर्धन, आशुतोष शेवपुरे, प्रभाकर सडेकर, डॉ. प्रफुल्ल सावंत आणि डॉ. सोनाली शिंदे हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून डॉ. पांडुरंग वाय. पाटील (समन्वयक) आणि सौ. रुजुदा आर. जाधव (सहसमन्वयक) कार्यक्रमाचे नियोजन पाहत आहेत.पर्यावरण विषयात रस असलेले विद्यार्थी, संशोधक तसेच संबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी