
कोल्हापूर, 16 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागांतर्गत आशियायी विकास बँकेच्या अर्थसाहाय्याने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र अॅग्रो बिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा व प्रक्षेत्र भेट यशस्वीपणे पार पडली. हा दौरा 10 ते 12 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.
प्रकल्प संचालक विनायक कोकरे व उपप्रकल्प संचालक डॉ. सुभाष घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभ्यास दौऱ्यात कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतील 32 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये 8 महिला व 24 पुरुषांचा समावेश होता. कृषि व्यवसाय तज्ञ अनिल जाधव व सत्यजित भोसले यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहिले. अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या दिवशी फलटण येथील वेंकटेश ॲग्रो प्रा. कं. लि., के.बी. एक्सपोर्ट तसेच सासवड येथील पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक संस्था या प्रक्रिया उद्योगांना भेट देण्यात आली. या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि निर्यात संधींबाबत माहिती घेतली.
दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्राला भेट देण्यात आली. येथे भाजीपाला प्रक्रिया केंद्र (VPF), विकिरण सुविधा केंद्र (IFC) व व्हेपर हीट ट्रीटमेंट (VHT) सुविधांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अपेडा (APEDA), वाशी येथे कृषी निर्यात प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली. तिसऱ्या दिवशी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे प्रक्षेत्र भेट देण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शेती तंत्रज्ञान, फळबाग व्यवस्थापन व संशोधन कार्याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
या अभ्यास दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यात सुविधा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळाली असून कृषी व्यवसायात मूल्यवर्धन व बाजारपेठ विस्तारासाठी नवीन दिशा मिळेल, असा विश्वास उपप्रकल्प संचालक डॉ. सुभाष घुले यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar