
बीड, 16 मार्च (हिं.स.)माजलगाव मतदारसंघात अद्ययावत आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आला असल्याची माहिती आमदार प्रकाश सोळके यांनी दिली आहे. मुंबई येथे राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत माजलगाव मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी विविध मागण्या मांडण्यात आल्या.
यामध्ये, वडवणी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी, तेलगाव येथील ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामासाठी निधी, माजलगाव येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी इमारत बांधकामासाठी ६३० लक्ष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.तसेच वडवणी येथील ग्रामीण रुग्णालयास कै. किसनभाऊ चाटे यांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली.
माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती संदर्भातील प्रस्तावही सादर करण्यात आला असून, त्यास लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. माजलगाव मतदारसंघातील नागरिकांना अधिक चांगल्या व आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis