
दिल्लीतील जलमहोत्सव कार्यक्रमात अमरावती जिल्ह्याचे केले प्रतिनिधित्वअमरावती, 16 मार्च (हिं.स.)दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये जलमहोत्सवाचा राष्ट्रीय सोहळा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या राष्ट्रीयस्तरावरील कार्यक्रमामध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरी म्हसला ग्रामपंचायतला विशेष सन्मान मिळाला. ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी साहेबराव राठोड तसेच सरपंच हेमंत ढेपे यांना या राष्ट्रीय जलमहोत्सव कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. जलमहोत्सवासाठी महाराष्ट्र राज्यातून केवळ दहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये मांजरी म्हसला ग्रामपंचायतची ‘नल जलमित्र’ या विशेष वर्गवारीतून निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील शाश्वत व कार्यक्षम पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दृष्टीने केलेल्या कामाची दखल घेत ही निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, राज्यमंत्री वी. सोमन्ना, राजभूषण चौधरी उपस्थित होते. मांजरी म्हसला ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा कर्मचारी साहेबराव राठोड यांनी ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेत सातत्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे त्यांची राज्यस्तरावरून या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी विशेष निवड करण्यात आली होती. विविध कामांमुळे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान प्राप्त केल्याबद्दल सीईओ संजिता महापात्र, जलजीवन मिशन प्रकल्पाचे संचालक बाळासाहेब रायबोले, अभियंता स्नेहा धावडे, गटविकास अधिकारी स्नेहल शेलार, ग्रामपंचायत अधिकारी रोहित तायडे यांनी कौतुक केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी