
बीड, 16 मार्च (हिं.स.)।
परळी मतदारसंघातील प्रत्येक शेत शंभर टक्के पक्क्या रस्त्याने जोडण्यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना' प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे. परळी येथे आयोजित आढावा बैठकीत बोलताना त्यांनी या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्याची घोषणा केली. शेतीमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे रस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कामांसाठी मनरेगा, जिल्हा नियोजन समितीसह विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. रस्त्यांच्या कामांमधील अतिक्रमणे आणि कायदेशीर अपिलांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगत मुंडे यांनी गावच्या सरपंचांच्या सूचनांना प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis