
अमरावती, 16 मार्च (हिं.स.)
: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘एपस्टीन फाईल’ या मुद्द्यावरून २३ मार्च रोजी नागपूर येथील Rashtriya राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयासमोर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आरएसएसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेबाबत आणि त्यांच्यावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, नुकतीच मुंबई येथे एक बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ डाव्या पक्षांचे प्रतिनिधी तसेच १३ ते १४ सामाजिक संघटनांचे (एनजीओ) प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत ‘एल्फिन्स्टन फाईल’ आणि त्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.आंबेडकर यांनी आरोप केला की, या फाईलमध्ये काही नावे समोर आल्यानंतर देशाच्या आर्थिक आणि कृषी धोरणांशी संबंधित काही आंतरराष्ट्रीय करार करण्यात आले आहेत. या करारांमुळे भारताच्या कृषी क्षेत्रावर आणि अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. विदेशी कृषी उत्पादनांना भारतात कमी शुल्कात प्रवेश दिला जात आहे, तर भारतीय उत्पादनांवर परदेशात अधिक शुल्क आकारले जात असल्याचा दावा त्यांनी केला.आरएसएस नेहमी राष्ट्रवाद आणि चारित्र्याची भूमिका मांडत आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर संघाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत २३ मार्च रोजी नागपूर येथे आरएसएस मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन समर्थन द्यावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी