
पुणे, 16 मार्च (हिं.स.)।विविध आरक्षणाच्या जागा ताब्यात घेताना आरक्षणापोटी जागा मालकांना देण्यात येणाऱ्या ‘टीडीआर’च्या (हस्तांतरण विकास हक्क) कार्यपद्धतीत आयुक्तांनी बदल केले आहेत. त्यामुळे जागा मालकांना ‘टीडीआर’चा मोबदला मिळण्यास लागणारा विलंब कमी होणार आहे.महापालिकेकडून हद्दीचा विकास आराखडा तयार केला जातो. त्यामध्ये विविध पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आरक्षणे दर्शविली जातात. ही आरक्षणे महापालिकेकडून रोख अथवा टीडीआरच्या स्वरूपात मोबदला देऊन ताब्यात घेतली जातात. ती विकसित करून नागरिकांना सुविधा पुरविल्या जातात.त्यानुसार टीडीआर स्वरूपात मोबदला देण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या कार्यपद्धतीमध्ये मोबदला देण्यास मोठा विलंब लागतो. त्यातून गैरप्रकारही होतात. या पार्श्वभूमीवर टीडीआर स्वरूपात मोबदला देण्यासाठीचा कालावधी कमी करण्यासाठी आयुक्त नवलकिशोर राम यांनी परिपत्रक काढून बदल केले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु