
सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)।शहरातील मध्यवस्तीमधील प्रभाग १५ मधील प्रमुख प्रश्न सोडवण्यास प्राधान्य असल्याचे सांगत प्रभागातील चाळीत राहणाऱ्या १० हजारांहून अधिक जणांना हक्काची घरे देण्याबरोबरच रस्ते, ड्रेनेजलाईन, पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न असणार आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक व उच्चभ्रू वसाहती असलेल्या प्रभाग १५ मधील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचे नियोजन असल्याचे विजयी झालेल्या नगरसेवकांनी सांगितले.
प्रभागातील भैय्या चौक व रामलाल चौक परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्राधान्य असणार आहे. प्रभागातील अनेक भागात अद्यापही ड्रेनेजची व्यवस्था नाही. नव्याने जोडलेल्या भागात ही सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
जुन्या चाळीत ड्रेनेजची समस्या आहे. त्याठिकाणी नवीन लाईन टाकण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. महापौरांनी बैठक घेऊनही हा प्रश्न सुटला नाही. यामुळे पाण्याची वेळ निश्चित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. झोपडपट्टी असलेल्या भागात अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे. आमच्या भागात झोपडपट्टींची संख्या मोठी आहे. यातील पात्र नागरिकांना महापालिकेच्या रमाई आवास योजनेतून घरकुल देण्याचे नियोजन आहे, असे या प्रभागातील नगरसेवक विनोद भोसले, चेतन नरोटे आणि श्रीदेवी फुलारे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड