
रायगड, 16 मार्च (हिं.स.)। देशातील वाढत्या खत मागणीचा विचार करून राष्ट्रीय रसायने आणि खते (आरसीएफ) च्या थळ प्रकल्पात नवीन एनपीके (संमिश्र) खत प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून हा प्रकल्प मार्च २०२७ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पामुळे देशातील संमिश्र खत उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होणार असून भारताच्या खत क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या राष्ट्रीय रसायने आणि खते कडून रायगड जिल्ह्यात औद्योगिक विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले जात आहेत. कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत परिसरातील गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत.
आरसीएफकडून मोबाईल मेडिकल व्हॅनद्वारे आरोग्य सेवा, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सहाय्य, शाळा व सार्वजनिक संस्थांना डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे, रस्ते बांधकाम, स्वच्छता मोहिमा तसेच सौर ऊर्जा प्रकल्प अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे.
याशिवाय अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आदिवासी क्रीडा स्पर्धांचे आयोजन, गरजू व वंचित मुलांना पोषक आहार वितरण, वृद्धाश्रमांना आर्थिक मदत तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कल्याणकारी कार्यक्रम राबवले जात आहेत.
कंपनीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे ७.२५ कोटी रुपये सामाजिक उपक्रमांवर खर्च केले आहेत. तसेच २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत सुमारे १०.५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या अंतर्गत थळ व नवगाव परिसरातील मच्छीमार महिलांना आईस बॉक्सचे वितरण, रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
याशिवाय ऊर्जा कार्यक्षमतेसाठी कंपनीकडून विविध ऊर्जा बचत प्रकल्प राबवले जात असून युरिया आणि अमोनिया प्रकल्पांमधील ऊर्जा वापर कमी करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
या नव्या औद्योगिक प्रकल्पामुळे स्थानिक पूरक उद्योगांना चालना मिळून प्रादेशिक आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. तसेच देशाच्या कृषी क्षेत्रालाही बळकटी मिळेल, असा विश्वास कंपनीच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. स्थानिक प्रशासन, नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अलिबाग व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आरसीएफ कटिबद्ध असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले.
• नव्या प्रकल्पामुळे संमिश्र खत उत्पादन क्षमतेत मोठी वाढ
• देशाच्या कृषी क्षेत्राला मिळणार बळकटी
• सीएसआर उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)