दुर्मिळ मज्जासंस्था आजारांवर नाशिकमध्ये प्रादेशिक कार्यशाळा संपन्न
Regional workshop on rare nervous system diseases held in Nashik
Regional workshop on rare


नॅशनल पॉलिसी फॉर रेयर डिसिजअंतर्गत आयोजन, तज्ज्ञांचा राहिला सहभाग

नाशिक, 16 मार्च (हिं.स.)।

- राष्ट्रीय दुर्मिळ आजार धोरण (NPRD) २०२१ अंतर्गत, नाशिक येथील नारायणी हॉस्पिटल येथे 'मज्जासंस्थेशी संबंधित दुर्मिळ आजार' या विषयावर एकदिवसीय प्रादेशिक संवेदीकरण कार्यशाळा उत्साहात पार पडली. मुंबईच्या शेठ जी.एस. मेडिकल कॉलेज आणि के.ई.एम. रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागाच्या सहकार्याने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांनी विविध गंभीर आजारांवर मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. सोनाक्षी पुणतांबेकर, डॉ. मयूर ठक्कर, डॉ. नेहा पिचड, डॉ. आनंद दिवाण, डॉ. राहुल बाविस्कर आणि डॉ. नीरज जैन यांची व्याख्याने झाली. उपचारास योग्य असलेले स्नायूंचे विकार, स्पाइनल मस्क्यूलर ॲट्रोफी, न्यूरोमेटाबॉलिक डिसऑर्डर, ल्युकोडिस्ट्रोफी आणि लायसोसोमल स्टोरेज डिसीजेस यांसारख्या क्लिष्ट विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक शहर आणि परिसरातील अनेक डॉक्टरांनी या कार्यशाळेला उपस्थित राहताना, दुर्मिळ आजारांच्या निदानाबद्दल नवीन माहिती जाणून घेतली. स्थानिक स्तरावर अशा आजारांचे लवकर निदान झाल्यास रुग्णांना वेळीच उपचार मिळणे सोपे होईल, असा सूर या चर्चेतून उमटला.यावेळी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दुर्मिळ आजार धोरणाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली. भारत सरकार नियुक्त केलेल्या केंद्रीय संस्थांमध्ये ठराविक दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी प्रति रुग्ण ५० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत पुरवते. या मदतीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना महागडे उपचार घेणे आता शक्य होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande