लातूरमध्ये अपात्र शिक्षकांच्या नियुक्तीवर संभाजी सेनेची कारवाईची मागणी
लातूर, 16 मार्च (हिं.स.)। लातूर शहरातील CBSE व सेमी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये शैक्षणिक अर्हता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती होत असल्याचा आरोप करत संभाजी सेना विद्यार्थी आघाडीच्या वतीने सोमवारी शिक्षण विभागाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. संब
अपात्र शिक्षक


लातूर, 16 मार्च (हिं.स.)।

लातूर शहरातील CBSE व सेमी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये शैक्षणिक अर्हता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती होत असल्याचा आरोप करत संभाजी सेना विद्यार्थी आघाडीच्या वतीने सोमवारी शिक्षण विभागाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. संबंधित शाळांवर आणि संस्थाचालकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संभाजी सेना विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद लातूर येथील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात निवेदन देत सांगितले की, शहरात CBSE व सेमी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या अनेक खाजगी शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. मात्र या शाळांमध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तसेच सेवा शर्ती नियमांचे उल्लंघन करून शैक्षणिक अर्हता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती केली जात असल्याचा आरोप करण्यात आला.

अशा शिक्षकांकडून दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे आत्मसात करता येत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच काही शिक्षकांकडून खाजगी शिकवण्या घेऊन पालकांची दिशाभूल केली जात असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

या संदर्भात संभाजी सेनेच्या वतीने यापूर्वीही माध्यमिक शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग तसेच उपसंचालक कार्यालयाला अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी संबंधित शाळांमध्ये अपात्र शिक्षकांची नियुक्ती करणाऱ्या संस्थाचालकांवर व शिक्षकांवर दहा दिवसांच्या आत कठोर कारवाई करावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संभाजी सेनेच्या वतीने देण्यात आला.

या आंदोलनात प्रदेश प्रवक्ते राजकुमार ग्राकुक, जिल्हा संपर्क प्रमुख धर्मराज पवार, प्रसाद पवार, सुरेश चव्हाण, हणमंत बार्लेकर, पृथ्वीराज चव्हाण, योगेश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande