
देवणी तालुक्यात उकाड्याचा प्रभाव, नागरिक व शेतकऱ्यांसाठी आव्हान
लातूर, १६ मार्च (हिं.स.) : देवणी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान झपाट्याने वाढत असून पारा आता ३६–३७ अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मार्च महिन्यातच उष्णतेत झालेली वाढ नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करायला भाग पाडत आहे.
सकाळी १० वाजल्यानंतर तापमान झपाट्याने वाढत असून दुपारी १२ ते ४ या वेळेत उष्णतेची तीव्रता सर्वाधिक जाणवते. अनेक ठिकाणी रस्ते ओस पडल्याचे दृश्य दिसून येत आहे, त्यामुळे नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत.
देवणी तालुका आणि आसपासच्या ग्रामीण भागातही उष्णतेचा परिणाम जाणवत असून शेतकरी आणि शेतमजुरांना दुपारच्या कडक उन्हात काम करणे कठीण जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी शेतीची कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत.
वाढत्या तापमानामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून काही गावांमध्ये विहिरी व बोअरवेलची पातळी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पाणीपुरवठ्याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis