
रत्नागिरी, 16 मार्च, (हिं. स.) : शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे संपूर्ण महाविद्यालयाच्या मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले.
ईगल तायक्वांदो सेंटरच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांनी उपस्थित मुलींना संकटकाळात स्वतःच संरक्षण करण्यासाठी कोणत्या छोट्या छोट्या युक्त्या वापरायच्या याचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित मुलींकडून ते प्रात्यक्षिक करूनही घेतले. योग्य पद्धतीने बांधलेला पंच आणि योग्य पद्धतीने मारलेली किक स्वतःच संरक्षण करण्यासाठी कशी उपयुक्त ठरू शकते, याचेही प्रात्यक्षिक यावेळी देण्यात आले.
अलीकडच्या काळात महिलांना कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळेला घराबाहेर पडावे लागते. एखाद्या संकटकालीन वेळी एकटच असताना केवळ हात आणि पायांचा योग्य पद्धतीने वापर करून कशा प्रकारे स्वतःची सुटका करून घेता येऊ शकते याचा प्रत्यक्ष अनुभव या मुलींनी या प्रात्यक्षिकांमध्ये घेतला.
कोणत्याही वयोगटातील मुली अथवा महिला तसेच मुलांनाही या खेळाचे प्रशिक्षण घ्यायचे असल्यास अभ्युदयनगर बहुउद्देशीय सभागृहातील सुरू असलेल्या ईगल तायक्वांदो सेंटरच्या प्रशिक्षणवर्गाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशिक्षिका संकेता सावंत यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी