
परभणी, 16 मार्च (हिं.स.)। कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये. उसतोड, वीटभट्टी कामगार तसेच बसस्थानक परिसरातील गरजू व भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींपर्यंतही अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांची नियमित पडताळणी करून खरोखर पात्र असणाऱ्यांनाच लाभ मिळावा व ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, अशा अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची कार्यवाही करावी, असे राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी सांगितले.
महेश ढवळे व सदस्य सुभाष राऊत यांनी अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी तथा तक्रार निवारण अधिकारी शोभा जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, तालुक्यातील पुरवठा निरीक्षक उपस्थित होते.
बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याचा पुरवठा, रेशन दुकानदारांकडून होणारे वितरण, लाभार्थ्यांची नोंदणी तसेच अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचत आहे का याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी अन्नधान्य वितरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि त्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी जिल्ह्यात अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेशन दुकानदारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही त्यांनी भर दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis